Get it on Google Play
Download on the App Store

सुकन्या

"सुकन्ये, वनात मैत्रिणींबरोबर जातेस, पण जरा जपून हं ! आणि लौकर परत यायचं. सूर्यास्ताच्या आत. शिबिरापासून फार दूर जायचं नाही."
"हं, आणि काय...झाडावर चढायचं नाही. सरोवरात उगाच डुंबत बसायचं नाही. वृक्षवेलींची शोभा पाहत कोठेही भटकायचं नाही.
वारुळांना दुखवायचं नाही. आई, कितीतरी वेळा तू हेच सांगतेस. अग, आता मी काय लहान बाळ आहे का अगदी ?" "हो ना-
आता ह्या आमच्या कळीचं फुलात रुपांतर झालंय अन् त्याचा सुगंध सभोवतीही दरवळू लागला आहे. नाही का ग ?""कल्पलते, उगाच चेष्‍टा करु नकोस हं ! तुझं आपलं काही तरीच. कुठलं बोलणं आणि कुठे नेतेस ! मी तशा दृष्‍टीनं आईशी बोलले नाही.""मग ? अगं, आईला काळजी वाटते म्हणून ती बोलते. पण जाऊ दे. तू आई झाल्याशिवाय नाही कळायचं तुला.""हं, पुरे आता. चला, उशीर होईल आपल्याला."सुकन्येने विषय बदलत मैत्रिणींना बाहेर काढलं आणि नम्रतेने आईला सांगितले,"आई, तू काही काळजी करु नकोस. आम्ही लौकर येऊ. जाऊ आता आम्ही ?"
आईची संमती घेऊन त्या वनात निघाल्या. वनाची शोभा त्यांचे लक्ष वेधून घेत होती. सुकन्या तर वनवेडी. वृक्षवेली भेटल्या की
मैत्रिणींनाही विसरायची. देहभान हरपून ते सौंदर्य नजरेत बंदिस्त करायची. आताही तिचे अनिमिष डोळे ते सारं सौंदर्य नेत्रांच्या
पाकळ्यांत साठवीत होते. वार्‍याच्या झुळकांवर तिचे मन झोके घेत होते. दुरुन येणार्‍या रानफुलांच्या सुवासाने ते धुंद बनत होते.
हिरवीगार वनश्री तिला मोह घालीत होती; आणि मन सुवासासारखं हलकं होत होतं. वार्‍यावर तरंगत होतं. मनात येत होतं, ’खरचं, कल्पलता मघाशी म्हणाली त्यात खोटं काय होतं ? माझ्या मनाच्या कळीचं आता फुलात रुपांतर झालं नाही का ?
विवाहाचे, स्वयंवराचे विचार माझ्या मनाभोवती फेर धरुन नाचत नाहीत का ? आणि-आणि विवाह झाला की, या वसंताची शोभा पाहायला आपण इथंच आलं पाहिजे. अगदी दोघांनी ! हिरव्यागार पानांनी नटलेले हे वृक्ष. त्यांवर उमललेली रंगीबेरंगी फुलं.
वृक्षांना बिलगून बसलेल्या आणि देठादेठात फुलून आलेल्या या नाजूक वेली जशा काही...’आणि मग ती स्वप्नात हरवून जाऊ लागली. अलकनंदेने तिला हलवीत विचारले,"अग, तुझं लक्ष आहे कुठे ? शिबिरातून निघाल्यापासून तू काही बोलतच नाहीस ?""सखे, हा सुरेख निसर्ग पाहताना माझं भानच हरपतं. डोळे भिरभिरत असतात अन्‌ शब्दच मुके होतात बघ !""हं आता काव्य पुरे हं. चल, आता आपण खेळू या."सख्यांनी तिला बळंच खेळायला घेतलं. मग ती खेळातही रमली. सरोवरात जलक्रीडा झाली. कंदमुळं, फळं यांच्यावर यथेच्छ ताव
मारला. गप्पागोष्‍टी झाल्या. दिवस कसा जात होता हे समजतही नव्हतं. उन्हं कलली. पुन्हा त्यांनी खेळायला सुरुवात केली; पण
आता मात्र सुकन्या गेली नाही. ती एकटीच राहिली. सख्या दूर गेल्या आणि ती झाडं, वेली, फुलं पुन्हा न्याहाळू लागली.’किती अकृत्रिम सौंदर्य आहे हे ! राजवाडयाच्या बागेतल्या आखीव, रेखीव सौंदर्यापेक्षा किती वेगळं ? वृक्षवेलींचं जाऊ दे-पण हे
झाडाखालचं वारुळ्सुद्धा किती छान दिसतंय, नाही ? एखादा भव्य ऋषीच तपाला बसल्यासारखा वाटतो आहे.’ या कल्पनेवर ती
मनाशीच खुदकन हसली. उत्सुकतेने वारुळाजवळ गेली. त्याच्याकडे बारकाईने पाहिले आणि हर्षभरित होऊन म्हणाली,"अय्या ! हे काय बाई चमकतं आहे ? रत्‍न तर नव्हेत ? वारुळात रत्‍नं असतात का ? का नागाचे डोळेबिळे तर नाहीत ना ?
नाहीतर आपण काडीने रत्‍ने म्हणून त्यांना हलवायचं अन्‌ सळसळत नाग बाहेर यायचा. फडा उभारुन !" या कल्पनेनं ती
शहारली. पण तिचं कुतुहल तिला गप्प बसू देईना. ती चमकणारी वस्तू तिला खुणावीत होती. तिनं मनाचा हिय्या केला.
समजूत घातली. "प्रत्येक वारुळात नाग थोडाच असतो ? ज्याअर्थी त्याला एवढी चमक आहे, त्याअर्थी ती रत्‍नेच असावीत. सख्या यायच्या आत ती काढून घ्यायला हवीत. कल्पलतेने ही रत्‍ने पाहिली कीम मला अगदी भंडावून सोडील. मग मीच तिची चेष्‍टा
करीन, ’कळीच फूल झालंय नाही का ?’ मला यांनी भेट-जाऊ दे. आधी ती रत्‍ने तर काढून घेऊ."मनोराज्यात दंग असतानाच सुकन्येने जवळच पडलेली एक काडी घेतली. अगदी टोकदार ! त्या काडीने ते रत्‍न पुढे ओढू लागली.
ते पुढे सरकत नव्हते. तिने त्याच्या बाजूला काडी जोरात खुपसली. पण काय झालं कोण जाणे ! त्या रत्‍नाचं चमकणंच थांबलं. ती हिरमुसली. मनाशीच म्हणाली, "जाऊ दे बाई ! निदान हे रत्‍न तरी हलक्या हातानं काढून घेतलं पाहिजे."तिने आणखी एक काडी घेतली. अगदी हळुवारपणे, त्या दोन्ही काडयांत ते रत्‍न पकडण्याचा प्रयत्‍न करु लागली. दोन काडयांत ते
घट्ट पकडून बाहेर ओढण्याचा प्रयत्‍न करु लागली. आणि-आणि ते रत्‍नही चमकेनासं झालं. आता मात्र ती फारच निराश झाली.
नाइलाजाने त्या काटक्या तिने जमिनीवर टाकल्या, आणि तिच्या अंगावर सरसरुन काटा आला. त्या काटक्यांची टोके रक्‍ताने
लाल झाली होती, धास्तावलेल्या मनाने तिने बारकाईने वारुळाकडे पाहिले. तिथे रक्‍ताची धार लागली होती. ती पाहताच ती सुकोमल सुकन्या
भीतीने थरथरु लागली. वार्‍यानं केळीचं पान थरथरावं तशी ! तिला काही सुचेना. भीतीने ती पांढरीफटक पडली. दरदरुन घाम
फुटला. घशाला कोरड पडली. डोळ्यांपुढे अंधारी आली. सारं विश्‍व आपल्या भोवती फिरते आहे अस वाटायला लागलं. हाताच्या
ओंजळीत तिनं आपलं तोंड झाकलं, आणि ती मटकन खालीच बसली. दुरुन येणार्‍या मैत्रिणींना हे दिसताच, त्या धावतच आल्या. कल्पलता तिच्याजवळ गेली. तिच्या तोंडावरला हात बाजूला करीत,
काळजीभरल्या स्वरात तिला विचारलं, "काय झालं ग ? बरं वाटत नाही की काय ? अशी घाबरलीस का ? जंगली जनावर तर
नाही ना आलं इथं ?"
सुकन्येच्या तोंडून शब्दही उमटत नव्हता. तिनं कसंबसं त्या वारुळाकडे बोट केलं. "नाग दिसला की काय तुला ?"
सुकन्येनं मानेनेच नाही म्हणून सांगितले. "मग कोण दिसलं ? घाबरलीस कशानं ? कूणी आहे का वारुळात ?""मी ! मी आहे या वारुळात."त्या घोगर्‍या पण गंभीर शब्दानं कल्पलता दचकलीच. भुताटकी वगैरे तर इथे नाही ना ? काय बोलावं हे तिलाही क्षणभर कळेना.
धीर करुन तिनं विचारलं, "मी ? मी म्हणजे ?"
"मी म्हणजे च्यवन ऋषी !"
च्यवनऋषींचे नाव ऐकताच कल्पलताही घाबरली. ’या ऋषींना काही त्रास झाला नाही ना ?’ तिच्या मनात विचार येऊन गेला.
पण आता आल्या प्रसंगाला सामोरे जाणे भाग होते. तिने सुकन्येच्या पाठीवरुन हात फिरवीत तिला धीर दिला. शांतपणाने दोन पावले पुढे झाली आणि म्हणाली,"प्रणाम मुनिवर्य. राजकन्येची सखी आपल्याला वंदन करीत आहे.""कशासाठी ? आणि ती राजकन्या कुठं आहे ?" रुक्ष स्वर तिच्या कानी आहे. ते ऐकून सुकन्या घाबरली. तिचा चेहरा पार उतरला. आता काहीतरी अघटित घडणार याची जाणीव झाली. अडखळलेल्या शब्दात
ती कल्पलतेला म्हणाली,"सखे, काय होईल ग आता ? माझ्याकडून फार मोठी चूक झाली. वारुळात रत्‍नं असल्याचं मला जाणवलं. ती काढण्यासाठी मी काठी आत खुपसली; पण ते डोळे असावेत ग या ऋषींचे !""सुकन्ये, त्यांच्या डोळ्यांना लागलं की काय ?""हं खूप रक्‍त वाहातंय. मला खूप वाईट वाटतंय गं. पण आता काय करायचं ? हा शापून भस्म करणार आपलं."
"वेडी कुठली. अग, आधीच घाबरु नकोस बाई ! तूच धीर सोडलास तर -बाकीच्यांची तोंडंही बघ उतरलीत. धीर धर. मी बघत्ये
आता." सुकन्येला धीर देऊन ती नम्र स्वरात, हात जोडून म्हणाली,"मुनिवर्य, माझ्या सखीकडून नकळत अपराध घडला. आपल्याला अतीव दुःख झालं. तिच्यावतीनं मी क्षमा मागते आपली.
अजाणतेपणानं घडलेल्या अपराधाला आपण क्षमा नाही का करणार ?""अजाणतेपणानं ! हंऽऽ ! अजाणतेपणानं अग्नीला हात लावला तर तो क्षमा करतो ?"
"नाही. पण-महात्म्यांची हृदयं उदार असतात. थोर असतात. त्यांच्या हृदयात मातेची ममता असते. आपण-""बस्स झाली साखरपेरणी ! चुक झाली. प्रायश्‍चित्त घ्यावंच लागेल.""सांगावं आपण.""तू नाही. तिनं घेतलं पाहिजे."एवढया वेळात सुकन्याही सावरली होती. सारा धीर एकवटून ती पुढं झाली. प्रायश्‍चित्त काही का असेना, ते घ्यायचं असा निश्‍चय
करुन ती म्हणाली, "मुनिराज, मी प्रायश्‍चित्त घ्यायला तयार आहे. चुकलं माझं. माझ्या चुकीमुळं आपण जन्माचे अंध झालात.
सांगा, काय करु म्हणजे आपल्या दुःखाची थोडीफार भरपाई होईल ?""सुकन्ये, मनापासून बोलतेस ना ?""होय. सांगावं आपण प्रायश्‍चित्त.""हं. पण तुला सांगण्यापेक्षा तुझ्या आईवडिलांनाच सांगायला हवं. जा, राजा शर्यातीला बोलावून आण.""जशी आपली आज्ञा !"लेकीवर कोणतं संकट आलं आहे, ते पाहण्यासाठी राजा-राणी दोघंही तातडीनं तिथं आले. चाहूल लागताच च्यवनऋषीही अंगावरचं वारुळ झटकून उभे राहिले. डोळ्यांतून रक्‍त ठिबकत असणार्‍या आणि क्रोधाच्या अधीन असलेल्या त्या ऋषींना राजाने साष्‍टांग नमस्कार केला. त्यांचे पाय धरुन काकुळतीने विनवणी करु लागला,"माझ्या मुलीचा अपराध आपण पोटात घाला. ती अजून अजाण आहे. तिच्यावरचा राग सोडावा. "राजा, तुझ्या मुलीनं मला जन्माचं अंध केलं आहे. मोठा अपराध केला आहे. त्याला तसंच मोठं प्रायश्‍चित्त घ्यावं लागेल. आहे कबूल ?""सांगावं.""तिनं माझी अंधत्‍वाची उणीव दूर करावी.""कोणत्या उपायानं महाराज ?""माझ्याशी विवाह करुन. आयुष्यभर माझी सेवा करुन.""हे काय बोलताहात ? काही विचार ?""राजा, मी विचार करुनच बोलतो आहे. उगाच संतापू नकोस. त्याचा काही उपयोग होणार नाही. माझी अट हीच आहे. हेच
प्रायश्‍चित्त सुकन्येनं घेतलं पाहिजे.""पण-पण-ती-""यात बदल होणार नाही. राजा, मी कधी असत्य भाषण करीत नाही. या मुली इथे विहाराला आल्या. त्यांच्या हसण्या-
खिदळण्याने माझी समाधी भंग पावली. मी डोळे उघडले तर समोर सुकन्या होती. तिचं लावण्य पाहून मी मोहित झालो.
तिच्याशी मी बोलणार होतो; पण अनेक वर्षांच्या मौनाने तोंडून शब्द फुटेना. मी तिच्याकडे पाहतच राहिलो; आणि काय घडतंय ते कळायच्या आतच मी अंध झालो. तरीही मी तिच्यावर प्रेम करतो. राजा, तिला दुखावणार नाही मी. फुलासारखं जपीन मी
तिला; पण ही अट मागे घेणार नाही."काय बोलावं हे राजाला सुचेना. राणीच्या तर काळजाचं पाणी पाणी झालं. तिच्या डोळ्यांतून आसवांच्या सरी ओघळू लागल्या.
तिने सुकन्येला घट्ट मिठी मारली. अश्रूंनी तिचे मस्तक भिजवले. सुकन्या मात्र आता अगदी शांत झाली होती. धीरगंभीर बनली
होती. मनाशी म्हणत होती, ’माझ्या हातनं अपराध घडला, त्याचं प्रायश्‍चित्त मला घेतलंच पाहिजे. कोणतीही तक्रार न करताना.
मी तयार झाले नाही तर हा कोपिष्‍ट ऋषी शाप देईल. राज्य जाळून टाकील. माझ्या निरपराधी प्रजेला त्याची झळ बसेल.
माझ्या आईबाबांना त्यामुळे क्लेष होतील. त्यासाठी मलाच माझ्या सुखस्वप्‍नांचा होम केला पाहिजे. मी उदबत्तीसारखं जळत
जळत जगेन आणि या अंध ऋषींना सेवेचा सुगंध देईन. या व्रतात यशस्वी होऊन आईबापांना समाधान देईन. यासाठी मलाच
तयार झालं पाहिजे. कसोटीचा हा क्षण. याला उतरलंच पाहिजे सुकन्येने आपल्या कोमल हातांनी आईच्या हातांची मिठी सोडवली. एका कृतनिश्‍चयाने ती पुढे सरसावली. निश्‍चयी स्वरात
म्हणाली, "महाराज, मी या विवाहाला तयार आहे.""आई, काळजी करु नकोस. योग्य तेच बोलते आहे. मी खूप विचाराने निर्णय घेतला आहे."सुकन्येचा निर्णय ऐकून तिच्या सार्‍या सख्यांचा डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या. कोण कुणाला सावरणार ? एकमेकी
एकमेकींच्या गळयात पडून रडू लागल्या. सुकन्या कल्पलतेजवळ गेली. तिचा हात हाती घेतला. समजावणीच्या स्वरात सांगितलं, "लते, अगं, तूच मघाशी मला धीर दिलास अन् आता तूच रडतेस ? अग, तुझी मैत्रीण सासरी निघालीय. तिला आनंदानं आणि
प्रेमानं निरोप द्यायचा सोडून, असं रडणं बरं दिसतं का तुला ? आणि हे बघ, माझ्या जागी आता माझ्या आईला तूच आहेस.
माझ्या आईबाबांना माझी आठवणसुद्धा होऊ देऊ नकोस."या बोलण्याने कल्पलतेला आपला हुंदका आवरता येईना. इतका वेळ शांत असणारे च्यवन ऋषी मात्र या मधाळ बोलण्याने
सुखावले. म्हणाले, "राजा, तुझी मुलगी खरोखरच विचारी आहे. गुणी आहे.""होय मुनिवर ! माझी सुकन्या आहेच गुणाची ! पण आज दैवमात्र तिची परीक्षा पाहताहेत. तिचा विचारीपणा तिच्या दुःखाला
कारणीभूत होतो आहे. महाराज, माझ्यावर दया करा. आपली अट मागे घ्या. मी त्याबदली आपल्याला हवं ते देतो. आश्रम
बांधून देतो. सेवेला दासदासी देतो. पाहिजे असेल तर माझं अर्धं राज्य देतो; पण माझ्या मुलीला अशी भयंकर शिक्षा देऊ नका
हो ! तिला वनवासी करु नका..."बाबा, आपण हे भलतंच काय बोलता आहात ? आपण क्षत्रीय. क्षत्रियानं कधी कोणापुढे हात पसरायचे नसतात. आपण दयेची
भीक मागता आहात ?""बाळ.."
"नको...तात ! माझ्यासाठी काही करु नका. माझं विधिलिखित अटळ आहे. आईबाप जन्माचे धनी असतात; कर्माचे नाही. आपण वाईट वाटून घेऊ नका. मी आनंदानं यांच्याशी विवाहाला तयार आहे. आई, तूही वाईट वाटून घेऊ नकोस. चला, राजधानीत चला. माझ्या विवाहाची तयारी करा."सुकन्येच्या निश्‍चयापुढे कोणाचे काही चालेना. सगळेजण राजधानीत आले. मोठया कष्‍टानं राजानं विवाहाची तयारी केली.
कन्यादान केलं. च्यवनऋषींना सुकन्येला सांभाळण्याची वारंवार विनंती केली. सुकन्या सासरी निघाली. आईला दुःखावेग आवरेना.
तिच्या सख्यांच्या डोळ्यांतले अश्रूही खळेनात. तिनंच सगळ्यांना धीर दिला; आणि राजप्रासादाकडे पाठ फिरवली. आता सुकन्या
ही राजकन्या राहिळी नव्हती. ऋषिपत्‍नी झाली होती. एका निश्‍चयाचं तेज जसं तिच्या मुखावर दिसत होतं, तसंच तिच्या
चालण्यातही निश्‍चयीपणा जाणवत होता. तिनं एक व्रत घेतलं होतं. त्याच्या पालनासाठी तिची पावलं च्यवनांच्या तपोभूमीकडे
पडत होती. सुकन्येने आश्रमात पाऊल टाकले आणि तिचे जीवनच बदलून गेले. सूर्योदयापूर्वीच ती उठत असे. आश्रमाचं अंगण स्वच्छ करुन
सडासंमार्जन करीत असे. सूर्याची कोवळी किरणं धरित्रीवर पडतानाच ती स्नानाला जाई. आश्रमाजवळच रम्य प्रवाह होता.
लतावेलींनी बहरलेला. फुलांनी फुललेला, स्नान करावं, देह लतावेलींनी सुशोभित करावा अन्‌ आश्रमात यावं. प्रसन्न चित्तानं. मनी
म्हणावं, ’माझं रुप पतिदेवांना दिसत नसेल, पण सुगंधानं तर ते सुखावतील ?’ आश्रमात येताच त्याचा प्रत्यय यावा. थोडया वेळानं पर्णकुटीभोवतीची ताजी भाजी खुडावी. पाकसिद्धी करावी. प्रसन्न चित्तानं पतीजवळ बसावं. आग्रहानं त्याला जेवू
घालावं. अतिथी आला तर त्याचा पाहुणचार करावा. त्यानंही प्रसन्न होऊन आशीर्वाद द्यावा. दिवस उलटत होते. महिने सरत होते. तिच्या सेवाव्रतानं तिच्या ठायी आगळं तेज निर्माण झालं. सौंदर्यावर सात्त्विकतेचा साज
चढला. मूळचं सौंदर्य आगळ्या तेजानं तळपू लागलं, नि मन आनंदानं भरुन गेलं. सुकन्येचे दिवस सुखात जात होते. आणि इकडे च्यवनऋषींना मात्र आपल्या कृत्याचा पश्‍चात्ताप होत होता. मनोमनी ते स्वतावर
चिडत होते. संतापत होते. म्हणत होते, ’च्यवना, क्षणैक मोहाच्या आधीन होऊन तू हे काय केलंस ? एवढया वर्षांची तपश्‍चर्या
फुकट घालविलीस. अरे, तुझ्या हृट्टापायी त्या सुकोमल, निरागस, निर्मळ मुलीच्या संसारसुखाचं वाटोळं केलंस. काय मिळवलंस ?’
या विचारांनी ते वारंवार दुःखी होऊ लागले. आपल्या वृद्धत्वाची नि अंधत्वाची त्यांना खंत वाटू लागली. या शल्याने त्यांना रात्रीही झोप लागत नसे. त्या दिवशीही ते सुकन्येच्या विचाराने अस्वस्थ झाले. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. ते देवाला विनवीत होते, "देवा, माझ्याकडून अपराध घडला; पण त्याची शिक्षा सुकन्येला देऊ नकोस. माझ्या तपाचं सारं पुण्य घे, पण या मुलीसाठी, तिच्या सुखासाठी माझं अंधत्व, वार्धक्य नाहीसं कर !" त्यांचे डोळे भरुन आले. त्यांनी आपला हात उचलला. शेजारीच गाढ झोपलेल्या सुकन्येच्या केसातून फिरवला. त्या प्रेमळ स्पर्शाने ती जागी झाली. पाहते तो फटफटलं होतं. ती झटकन उठली. पतिचरणांना वंदन केलं. तिनं पाहिलं, पतीचे डोळे पाझरत होते. तिनं विचारलं, "नाथ, आपल्याला बरं नाही का ? आपले डोळे.."
"सुकन्ये, तुझ्या विचाराने...""माझा विचार ? कसला ? मी तर आनंदात आहे. आपल्यासारख्या तपोनिष्‍ठ मुनींची सेवा करायचं भाग्य मला मिळालं. खरचं मी धन्य आहे. आपण दुःखी होऊ नये.""नाही पोरी...मला दिसत नसलं तरी समजतं.."तो विषय थांबवीत सुकन्येनं सांगितलं, "नाथ ! सूर्योदय व्हायची वेळ आली. मी स्नान करुन आले हं !" सुखावलेल्या मनानंच ती आश्रमाबाहेर पडली."ही रुपयौवना कोण असावी बरं ?"
स्नान करता करता पुरुषाचा आवाज सुकन्येच्या कानावर आला. ती दचकली. ओल्या अंगावर तिनं चटकन वस्त्र ओढून घेतलं. ती संकोचून उभी राहिली. पुन्हा शब्द आले,"देवी ! तुझ्या रुपसौंदर्याकडे पाहून आम्ही चकित झालोत. असलं सौंदर्य आमच्या पाहण्यात नाही. तू कोण ? कुठली ?"
खाली पाहात ती म्हणाली, "मी कोणीही असले तरी त्याच्याशी आपल्याला कर्तव्य काय ? परस्त्रीकडे असं पाहणं बरं नव्हे..""खरं आहे. पण याला जबाबदार आहे तुझं सौंदर्य ! देवी, आम्ही दोघे अश्‍विनीकुमार आहोत.""प्रणाम करते मी आपल्याला. माझे पती आश्रमात आहेत. आपल्या दर्शनानं त्यांनाही आनंद होईल.""कोणाचा आहे हा आश्रम ?""च्यवन ऋषींचा. मी त्यांची धर्मपत्‍नी आहे.""म्हणजे त्या म्हातार्‍याशी संसार करतेस तू ?""क्षमा करा मला ; पण आपण सभ्यतेनंच बोलावं. कोणतीही सती पतिनिंदा सहन करीत नाही. आपल्याला माहीत असायला हवं.""किती निष्‍ठावान आहेस तू ! या निष्‍ठेने आम्ही अधिकच भारावून गेलो आहोत. देवी, आमच्याकडे पहा. आम्ही सुदृढ आहोत, सुंदर आहोत, तरुण आहोत. त्या म्हातार्‍यासाठी जीव टाकण्यापेक्षा आमच्यापैकी...""बस्स...पुरे झालं ! एक शब्दही बोलू नका.""अग, पण तुझ्या हितासाठी...""माझं हित पाहायला माझे पती समर्थ आहेत. त्यांची चिंता करायचं कारण नाही तुम्हाला. आपण कितीही चांगले असलात तरी माझ्या दृष्‍टीनं त्याला कवडीचीही किंमत नाही. कोणी कितीही प्रयत्‍न केला तरी माझी पतिनिष्‍ठा ढळणार नाही. माझं सतीचं व्रत कधीही भंगणार नाही. जा. चालते व्हा इथून !""सुकन्ये, तुझ्या भाषणाने आम्ही खरोखरच प्रभावित झालोत. तुझ्यासाठी काहीतरी करावं, अशी आमची इच्छा आहे.""हे तरी निर्मळ मनानं विचारता आहात ना ? तर सांगते. आपण निष्णात वैद्य आहात. आपल्या दिव्य औषधींनी माझ्या पतीची दृष्‍टी परत मिळवून द्या.""जरुर ! दृष्‍टीच काय, तारुण्यही परत मिळवून देऊ...पण""त्याबदली आपल्याला काही पाहिजे का ? धनदौलत पाहिजे असेल तर चिंता करु नका. मी देईन, माझ्या बाबांना सांगून...""छे...त्याची आवश्यकता नाही...""मग...काय हवंय आपल्याला ?""देशील ?""हं...""मग ऐक...च्यवनाला दृष्‍टी आल्यावर, तू आमच्या तिघांपैकी एकाची पती म्हणून निवड केली पाहिजेस. आहे अट मान्य ?""ही कसली विचित्र अट ? हे कसलं बोलणं ?""योग्य तेच बोललो. नीट विचार कर अन्‌ मग होकार नकार दे."सुकन्या विचारात पडली. ’काय करावं ? मान्य करावी अट ? पती डोळस होण्याची संधी आली आहे. आपल्या पापाचं परिमार्जन होण्याची वेळ आली आहे. करु या अट मान्य...पण..पण हे तिघं सारखेच दिसायला लागले तर ? नेमकं कसं बाई ओळखायचं ह्यांना ? काहीतरीच होऊन बसायचं. त्यापेक्षा...’"सुकन्ये, एवढा कसला विचार करतेस ? बोलत का नाहीस ?""याचा निर्णय मी घेण्यापेक्षा, माझ्या पतीलाच विचारुन येते आणि सांगते. थांबावं आपण !"सुकन्या आश्रमात आली. तिने च्यवनऋषींना सारी कथा सांगितली. क्षणभर त्यांनीही विचार केला. सुकन्येच्या मनात आलेली शंका त्यांच्याही मनाला स्पर्शून गेली. पण तेवढया कारणासाठी ही आलेली संधी वाया घालवावी, असं त्यांना वाटेना. त्यांनी सुकन्येला सांगितलं, "ठीक आहे. चल, मी येतो त्यांच्याकडे." दोघेही अश्‍विनीकुमारांकडे आले. हात जोडून च्यवनऋषी म्हणाले ,"वैद्यराज, आपली अट आम्हाला मान्य आहे."
"मुनिवर्य, आपण या प्रवाहात स्नानासाठी बुडी मारावी. आपली मनोकामना पूर्ण होईल."रोजच्या सवयीप्रमाणे च्यवनऋषींनी प्रवाहात उडी मारली. त्याच वेळी अश्‍विनीकुमारांनीही पाण्यात उडया टाकल्या. सुकन्या प्रवाहाच्या काठावर धडधडत्या हृदयाने उभी होती. आता काय होणार ? तिची उत्कंठा वाढली आणि भीतीही ! मनात ती देवाचा धावा करीत होती. त्याला विनवत होती, "देवा ! आजवर मी जर मनोभावाने पतीची सेवा केली असेल, तर या सतित्वाच्या कठीण परीक्षेत मला यश दे. माझ्या हातून पाप घडू देऊ नकोस. देवा, तूच माझं अन्‌ माझ्या पातिव्रत्याचं रक्षण कर."प्रतीक्षेत आणखी काही क्षण गेले आणि त्या प्रवाहातून तीन पुरुष वर आले. अगदी एकसारखे ! सुंदर...तरुण आणि सुदृढ ! तिघेही दिसायला सारखेच. सार्‍यांचं लक्ष सुकन्येकडे वेधलेलं ! क्षणभर सुकन्याही बावरली. गोंधळली. पण क्षणातच तिने स्वतःला सावरले. तिघांच्याकडे बारकाईने पाहू लागली. पतीला शोधू लागली. आणि पाहता पाहता ती हसली. पटली...अगदी खात्रीनं पतीची ओळख पटली ! ती मनाशीच म्हणाली, "अगदी हेच-हेच आपले पती. त्यांच्या डोळ्यांतून स्निग्धता अन्‌ तृप्‍ती पाझरते आहे. डोळे कसे शांत आहेत. या दुसर्‍या दोघांच्या डोळ्यांत कामुकता आहे. वासना आहे. अभिलाषा आहे. कारण त्यांना मी हवी आहे. पण त्यांना म्हणावं, डोळे म्हणजे मनाचा आरसा ! अंतःकरणातले सगळे भाव डोळ्यांत दिसतात. तुमची मनं मलीन आहेत. वासनेनं बरबटली आहेत. ते मनाचं रुप डोळ्यांत दिसल्याशिवाय राहील का ? उलट माझ्या पतीचं तसं नाही. तिथं आसक्‍ती नाही, तृप्‍ती आहे. देहापलीकडे असलेल्या प्रेमाची निरंजने तेवत आहेत. त्यांना का मी ओळखू शकणार नाही ?"
सुकन्येचं इतके वर्षं मावळलेलं हसू आज उमललं. ती मनापासून हसली. नवविवाहित युवतीच्या अधीरतेनं ती पुढे झाली अन्‌ पतीला मिठी मारली. प्रेमानं मस्तक त्यांच्या वक्षस्थलावर घुसळीत म्हणाली, "ओळखलं ना बरोबर ?"
च्यवनऋषीही हर्षविभोर झाले. तिच्या मस्तकावर हळुवार हात फिरवीत म्हणाले, "सुकन्ये-"
आनंदात पुढचे शब्दच विरुन गेले. पण शब्दाविना दोघांनाही खूप काही उमगलं. त्या अद्वैतानंदात ते भोवतालचं जग विसरुन गेले.
"आम्ही आहोत म्हटलं इथं !" अश्‍विनीकुमारांच्या शब्दांबरोबर सुकन्या लाजून दूर झाली. क्षणभर सारेच स्तब्ध होते. त्या शांततेचा भंग करीत अश्‍विनीकुमार म्हणाले, "सुकन्ये, तुझ्या पातिव्रत्याच्या प्रभावाने आम्ही पराभूत झालोत. आमच्याकडून मोठा अपराध घडला."
"असं कसं म्हणता, आज आपल्या विद्येमुळे आपण या गरीब बहिणीला सौभाग्यदान दिलं आहे. आपले उपकार-"
"बहीण म्हणतेस अन्‌ उपकाराची भाषा बोलतेस ?"
"चला आता. आश्रमात चला. फलाहार करुनच जा."
सुकन्या आणि च्यवनऋषींच्या पाठोपाठ अश्‍विनीकुमार आश्रमाच्या दिशेने जाऊ लागले. सूर्य आता वर आला होता. आपल्या कोवळ्या किरणांतून आनंदाचा वर्षाव करीत होता; आणि त्या वर्षावात ते चौघेही न्हाऊन निघत होते.

पौराणिक कथा - संग्रह १

संकलित
Chapters
हयग्रीव अवतार बौद्धावतार हरिश्‍चंद्र वज्रनाभ राजाची कथा उषा-अनिरुद्ध विवाह यादवांच्या नाशाची कथा महाप्रलयाची कथा व्यासपुत्र शुकाची कथा मुचकुंदाची कथा उर्वशी व पुरुरवा ध्रुवाची कथा अयोध्येच्या धोब्याची कथा गाईचा महिमा दंडकारण्य उत्पत्ती कथा कर्णपुत्र वृषकेतूची कथा नृसिंह व वीरभद्र पाच पांडव व द्रौपदी कलंकी अवतार तपती आख्यान कृपाची जन्मकथा सरस्वतीची झाली नंदा रामभक्त राजा सुरथ श्‍वेतराजाचा उद्धार शिवभक्त वीरमणी रावणकथा विष्णूचे चक्र व गदा वैजयंतीमालेची कथा नंदीची कथा सांबाची सूर्योपासना प्रल्हाद आख्यान पौंड्रकवासुदेव वध व काशिदहन शांतीचा मार्ग शंबरासुर वध पारिजात कथा श्रीवत्सलांच्छनाची कथा वृकासुराची कथा स्यमंतक मण्याची कथा १ स्यमंतक मण्याची कथा २ दशरथ कौसल्या विवाह त्रिशंकूची कथा भृगुपुत्र शुक्राची कथा कर्कटी राक्षसीची कथा जीवटाख्यान समुद्रमंथन व राहूची कथा रेणुकेचा जन्म रेणुका स्वयंवर सहस्रार्जुनाची कथा जयध्वजाचे आख्यान सौभरी चरित्र गरुडाचे गर्वहरण पराशर कथा श्रीमतीचे आख्यान कौशिकाचे वैष्णवगायन क्षुप व दधिचाची कथा श्रीरामांची सतीकडून परीक्षा शंखचूडाची कथा शिवांचे अवतार अवदशेची कथा कान्यकुब्ज नगरीची कथा भरताचे मागणे उर्वशी लोपामुद्रा सती सुकन्या नीलम आणि ऋता मैत्रेयी गार्गी सुभद्रा चित्रांगदा देवकी यशोदा