Get it on Google Play
Download on the App Store

आकाश 4

आकाश जणू ब्रह्माचे रूप
निळ्या निळया आकाशाचा रंग आपण राम-क्रष्णांना दिला आहे. सर्वव्यापी आकाशाचा रंग ज्यांना आपण देव मानले त्यांना नाही द्यायचा तर कोणाला द्यायचा? “नभासारखे रूप या राघवाचे” असे समर्थ म्हणतात. नभाप्रमाणे निळा, नभाप्रमाणे व्यापक, जवळ परंतु दूर, असा तो प्रभू आहे. जणू ईश्र्वराचे, परब्रम्हाचे स्वरूप म्हणजे आकाश. आकाशावरून विश्र्वंभराची कल्पना करावी.

कवींच्या कल्पना

प्रचीन काळापासून आकाशाने कवींना वेड लावले आहे. वेदांतील ऋषी विचारतो: “खांबाशिवाय, आधाराशिवाय हे वरचे आकाश कोणी पसरले? कोणी उभे कोले?” कोणाच हा विशाल तंबू? त्याला ना काठी, ना आधार! असे अरबी-पर्शियन कवी विचारीत. मुसलमानी मशिदी यांचा वर घुमट असतो. आकाशाची ती कल्पना आहे. वाश्र्वाची प्रचंड मशीद प्रभूने उभारलेली आहे! आकाशाच्या घुमटाखाली बसून प्रार्थना करावी. विश्वाच्या भव्य इमारतीचा घुमट म्हणजे आकाश. किती सुंदर भव्य कल्पना! आणि अरबी लोक त्याला तंबू म्हणत. त्या तंबूत देवाने झूंबरे टांगली आहेत. दिवे लावले आहेत. तंबूला हिरे, माणके, मोती यांच्या झालरी आहेत, अशी वर्णने ते करतात. सृष्टीसुंदरीने तोंडावर घेतलेला हा बुरखा आहे, अशी ही सुंदर कल्पना कोठे तरी मी वाचली होती. आणि ही उलटी कढई आहे अशी कल्पना आपल्याकडील काव्यात अनेक ठिकाणी आढळते.

हा वर पसरलेला समुद्र आहे, चंद्राची नाव तिच्यातून चालत आहे अशीही एक रमणीय कल्पना एका मराठी कवितेत आहे: ‘न हे नभोमंडळ, वरिराशी’ असे हा कवी असेही म्हणतो. आणि तारका म्हणजे लाटांचा फेस तो रूपक पुढे चालवून वर्णितो.

आकाश म्हणजे देव

पंचमहाभूतांपैकी आकाश हे परमभूत आहे! इतर भूते त्याच्या पोटात राहून व्यापार करतात. चिनी लोक आकाशाला देव मानीत. चिनी इमारतींना कळस नसतात. तो आकाशाचा अपमान होईल, असे त्यांना वाटते. आकाशात का असे घुसायचे? आकाश म्हणजे प्रभू. आकाश म्हणजे प्रभूची कृपा. त्याच्या कृपेची छाया. या आकाशाच्या घुमटाखाली कोणीही बसावे. आकाशाचे छत सर्वांसाठी. विश्वाचा हा निळा मंडप सर्वांसाठी-चराचरासाठी. चंद्र, सूर्य, तारे-सारे येथून सर्वांना प्रकाश देतात. देवाचा मंडपही सर्वांसाठी, देवाचा प्रकाशही सर्वांसाठी.