Get it on Google Play
Download on the App Store

दिवाळी सणावर संक्रांत

मनुष्याचे मन सदासर्वदा उत्सवप्रिय असते. यद्यपि, कैक नाटक-कादंबऱ्यांच्या प्रस्तावनांचा आरंभ या वाक्याने झाला असला, पुराणाभिमानी लोकांनाही हे मत मान्य असले, 'दक्षिणा प्राइज कमिटीने' बक्षिसास पात्र ठरविलेल्या पुस्तकांतही जरी हे वाक्य एखादे वेळी दिसून आले, फार कशाला हे वचन शाळाखात्याने सुध्दा मंजूर केले असले तरीसुध्दा ते सर्वांशी खरे आहे. हवा, पाणी, अन्न, झोप, खोटे बोलणे, बालविवाह, होमरूल, वगैरे बाबतींप्रमाणे या उत्सवप्रियतेचीही मनुष्यप्राणाच्या जीवनाला महत्त्वाची आवश्यकता असते. मात्र परमेश्वराने या उत्सवप्रियतेची काही नैसर्गिक बाह्य योजना करून ठेवलेली नसल्यामुळे मनुष्यजातीला कृत्रिम साधने निर्माण करावी लागली आहेत. ज्या परमेश्वराने माशाच्या पोराला उपजत पोहावयाला शिकवून मात्क्यान पोहण्यासाठी पाण्याचाही भरपूर पुरवठा करून ठेवला, पक्ष्याच्या पिलाला भरार्‍या मारावयास शिकवून त्या विद्येला अवसर मिळण्यासाठी आडमाप आभाळाचे छतही खूप उंचावर टांगले, माणसाच्या बच्चाला उपजतांचे खोटे बोलावयास शिकवून, असत्याच्या स्वच्छंद संसाराला सोईस्कर अशी समाजरचनाही करून दिली, त्याच परमेश्वराने मानवी मनातही उत्सवप्रियता प्रस्थापित करून ठेवून, तिच्या समाधानासाठी निसर्गसिध्द साधने निर्माण करून ठेवू नयेत हे मोठे आश्चर्य आहे! ही गैरसोय दूर करण्यासाठी मनुष्याने काळाच्या एकरूप ओघाला निरनिराळी वळणे देण्याचा आपल्या परीने पुष्कळसा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. सण, श्राध्दे, पक्ष, जयंत्या वगैरे सर्व प्रतिसृष्टी याच प्रयत्नांचा परिणाम आहे. कार्यकारणभावाचा विशेषसा विचार न करता मनुष्याने तीनशेसाठ दिवसांपैकी, काहींना कमी व काहींना अधिक महत्त्व देऊन तुलनात्मक उत्सवसाधने निर्माण केलेली आहेत आणि हजारो वर्षांच्या संस्कारांनी या करामतीला निसर्गाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे! दसर्‍याच्या दिवसाला पंचवीस, किंवा व्यतिपातयुक्त दिवसाला तेवीस तास नसताही आम्ही एक प्रयाणाला अति अनुकूल आणि दुसरा तितकाच प्रतिकूल समजतो! देवादिकांच्या जन्मदिवसाप्रीत्यर्थ आपण खडखडीत उपास करतो तर वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त खीर ओरपीत असतो. (त्या दिवशी वडिलांच्या मिळकतीचा कबजा आपल्याकडे आल्यामुळे झालेल्या आनंदाच्या भरात तर कदाचित ही गोड योजना केलेली नसावी?) विक्रमसंवताच्या मरणदिवशी, दिवाळीच्या पक्वान्नांनी भरलेली पाने उठवून तोंड गोड करावयाचे आणि शालिवाहन शकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कडुलिंबाची पाने खाऊन तोंड कडू करून घ्यावयाचे! अमावास्या आणि प्रतिपदा ही तर काळाची पाठोपाठची अपत्ये ना? मग एकीच्या सकाळी आपल्या नावावर एखादी व्ही.पी. आल्याचा त्रास व दुसरीच्या सकाळी मनीऑर्डर आल्याइतका आनंद अगदी निष्कारण वाटतो तो का? आपल्या पितरांच्या उध्दारासाठी (खरे म्हटले तर अवतारासाठी) भरभाद्रपदातला काळा पंधरवडा का निवडावयाचा आणि दुसऱ्यांची पितरे उध्दरण्यासाठी शिमग्यापुनवेचे चांदणे का पसंत करावयाचे हे सांगावयाला स्वर्गातले पितरच खाली आले पाहिजेत. तात्पर्य हेच की, एखाद्या दिवसाला, उत्सवहेतू व्हावयाला स्वाभाविक कारणाची मुळीच अपेक्षा नसते.

वरील सर्व उत्सवहेतू प्रकारांत सणांना बर्‍याच कारणांमुळे अग्रस्थान द्यावे लागेल; आणि त्यातल्या त्यात दिवाळीच सण म्हणजे सर्वांत उच्च दर्जाचा! दिवाळी! दिवाळी! दिवाळी येण्यापूर्वी महिना दीड महिना आधीपासूनच समाजात केवढी गडबड उठून जाते! 'दिवाळीकरता मुद्दाम सवलतीचे दर!', 'दीपावलीप्रित्यर्थ!' वगैरे मथळयाच्या जाहिरातींतून दिवाळीसाठी लागणार्‍या सामानाच्या पाटया झळकू लागतात! 'सव्वा रुपयांत दिवाळी', 'साडेतीन आण्यांत दिवाळी', 'पैशापासरी दिवाळी' यासारख्या आरोळया कोणी ऐकल्या नाहीत बरे! वर्तमानपत्रांतून सुवासिक तेले, उटणी, अर्गजे, मसाले यांच्या जाहिरातींचा इतका आनंदी घमघमाट सुटलेला असतो की, त्यामुळे आसपासच्या इसब, नायटे, चट्टे यांबद्दलच्या जाहिरातींतली किळसवाणी घाण तर मरतेच मरते पण आतल्या मजकुराच्या घाणेरडेपणाबद्दल सुध्दा काही वाटेनासे होत असते. सवलतीच्य या सुळसुळाटात दिवाळीशी ज्यांचा काही अर्थाअर्थी संबंध नाही अशा प्रकारचे पुस्तके, लाकूडकाम यांसारखे पदार्थही दिवाळीनिमित्त सवलतीच्या दराने विकावयास निघतात. रुळपट्टीचे नकाशे, नारुवर वस्ताद, मिशांचा कलप यांसारख्या चिजांना दिवाळीच्या हंगामात वृत्तपत्रांच्या रकान्यांतून आडदराने भटकताना पाहिल्याचे मला स्मरते. दिवाळीच्या मोसमापुरते विम्याचे दरही कमी झाल्याचे ऐकिवात आहे. आमच्या गावच्या मसणवटीतल्या लक्कडवाल्याने तर चुरशीच्या भरात 'मरतिकाचे साम्यान' आणि गोवर्‍यासुध्दा दिवाळीच्या दिवसांत कमी दराने देण्याचा पुकारा केला होता असे म्हणतात.

इतका जिच्या आनंदाचा नुसता पूर्वरंग, त्या दिवाळीचा ऐनरंग म्या कोठवर वर्णावा? घरात पक्वान्नांची रास आणि घराबाहेर दिव्यांची आरास! माहेरी आलेल्या मुली, शाळांना सुट्टया झाल्यामुळे बेकार आनंदात असलेली मुले, कचेऱ्यांना रजा असल्यामुळे सुखावलेली वडील माणसे! सर्रास कोणालाच ना काम ना धंदा! कालक्षेप हाच या दिवसांतला मुख्य व्यवसाय.

धडा सहावा

वसंत ऋतूचे दिवस! हे दिवस चहूकडेच वर्णनीय स्वरूपाचे असतात. त्यातून (मी काल येथे येऊन पुन्हा उद्याच पु्ण्यात जाणार असलो तत्रापि) आमच्या या मुंबई शहरात तर हे दिवस विशेष गंमतीचे वाटतात. वृक्षसृष्टीत शेकडो पंचविसांना नवी पालवी फुटत आहे. माझ्या समोरच्या बारा झाडांपैकी पाच, खेड्यात होणा-या लग्नांतील व-हाडी मंडळींप्रमाणे जुन्यापान्या पानांवरच गुजराण करीत असून चार झाडांजवळ झब्बू खेळताना आधी सुटलेल्या गड्याप्रमाणे शपथेला सुद्धा एखादे पान नाही; फक्त तीन झाडे मात्र कोवळ्या पालवीमुळे ‘नुक्तीच मिसूर फुटलेल्या’ तरुण घोडेस्वार कादंबरीनायकाप्रमाणे शोभताना दिसल्यामुळेच झाडपाल्यासंबंधी वरील विधान केलेले आहे. पुष्पसृष्टीची साक्ष पटविण्याला भाबड्याच्या टोपीवरील वेलबुट्टीतील फुलांचा बराच आधार मिळण्यासारखा आहे. दोन प्रहरच्या उन्हाच्या रखरखीत सलगीमुळे गावातल्या होळ्या अजून साफ विझल्या नसाव्या असे मनाला वाटत आहे. छपरांच्या वळचणींतून विसावणा-या पारव्यांकडे पक्षीगणाचे प्रतिनिधित्व आलेले आहे. शिवाय, कोकिळांचे शहरात बसणारे दूधभाऊ मधून मधून मंजुळ कावकाव करीत आहेत. हिडिंबेच्या माहेरच्या नात्याची एक मोलकरीण समोरच्या नळावर मर्दानी पेशाने भांडी घाशीत असली तरी मनोहर युवतिसमूहाचे प्रस्तुत प्रसंगी एकच उपलब्ध उदाहरण या दृष्टीने महत्त्वाचे वाटत आहे. गिरण्यांतून व कारखान्यांतून खपणारे कामगार चालू लढाईत खपणा-या हिंदी सैनिकांचा हेवा करीत आहेत. ठिकठिकाणच्या उपहारगृहांतून व विश्रामालयांतून समयोचित शीतपानात गढलेल्या भाग्यशाली लोकांकडे बाहेरूनच आशाळभूत नजरेने पाहणारे रिकामटेकडे बालचारुदत्त, दारापुढे पडलेल्या बर्फाच्या भुशावर पायांच्या अंगठ्यांनी आपल्या ललाटीच्या कंगाल रेघोट्यांची चित्रे काढीत आहेत. शेजारच्या मोटारींच्या आणि टिनच्या कारखान्यांतील कारागिरांची करामत बंगाली वक्त्यांच्या जहाल अवसानाने ठणाणून दुपारच्या झोपेसाठी तडफडणा-या माझ्या मनाला इतकी सतावून सोडीत आहे, की त्या सा-या हत्यारांचे ठोके एकदम माझ्या टाळक्यावर आपटल्याने सुद्धा मला असा त्रास होणार नाही. तशांतून, असा टोणप्याचा मार चुकवून पळभर झोपेची झापड डोळ्यांवर पडलीच तर मध्येच ट्रामगाडीची कठोर घरघर, उचलजागत्या मनाला स्वत:ला काळझोपेची घरघर लागल्याचे भेसूर स्वप्न दाखवून जागे करावयाला तयार! आणि नंतर, जणू काय या क्षणमात्र जागृतीचा फायदा घेण्यासाठी टपून बसलेला समोरच्या हॉटेलातील ‘छोकरा’ कर्कश आवाजात ‘दोन इसम ती आणे, चार इसम सव्वा दोन आणे’ वगैरे ओरडून आपल्या पाहुण्यांची किंमत ठरवून मोकळा होत आहे व मला त्याच्याइतका कर्कश, पण शतपट भेसूर आवाजाने ‘विविधा’च्या उदाहरणातल्या रकमा ओरडणा-या आमच्या तिस-या इयत्तेवरच्या मास्तरांची बुद्रुक आठवण करून देत आहे. या आठवणीने विचारांची विषयांतरे इतक्या अचाट वेगाने- वाचकहो! माफ करा! मनोरंजनाच्या संपादकांनी मला ‘वसंत’ अंकासाठी काही तरी लिहिण्याची आज्ञा केल्यामुळे जुन्या नटीसूत्रधारवादांतील सूत्रार्धानुरूप ‘सध्या नुकत्याच लागलेल्या या ऋतूत अनुसरूनच’ काही लिहिण्याचा माझा संकल्प नाइलाजामुळे असा अर्धवटच सोडावा लागत आहे! येथपर्यंत कसे तरी ओढले, पण आता पुढे ‘वसंतऋतू’संबंधी काय लिहावे मुळीच सुचत नाही. वसंतऋतूचे वरील वर्णनही कविसंप्रदायाला थोडेसे सोडून असण्याचा संभव आहे; कारण, तूर्त मी तिरस्थळी असल्यामुळे माझा मराठी कादंब-यांचा सर्व संग्रह घरी राहिला आहे म्हणून, वर्णनासाठी केवळ प्रत्यक्षावलोकनावरच भिस्त ठेवावी-