Get it on Google Play
Download on the App Store

दया पवार

दया पवार

भयंकर असे सामाजिक वास्तव अभिव्यक्त करणारे व तथाकथित सवर्णांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे साहित्यिक! एक दु:खाने गदगदलेले झाड!

 

दया पवार तथा दगडू मारुती पवार हे एक आघाडीचे दलित साहित्यिक होत. कविता, कथा, समीक्षा, आत्मकथन, ललितलेख असे विविध साहित्य प्रकार त्यांनी हाताळले.

अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव हे त्यांचे जन्मगाव. घरच्या दारिद्रयामुळे व जातिव्यवस्थेतून निर्माण झालेल्या जाचक व प्रतिकूल परिस्थितीमुळे सतत संघर्ष करतच त्यांना आपल्या आयुष्याचा मार्ग चोखाळावा लागला. महाराष्ट्र बौद्ध साहित्य सभा, प्रगत साहित्यसभा या संस्थांशी संबंध आल्याने १९६८ पासून दलित साहित्य चळवळीत ते सक्रिय सहभागी होते. मुंबईत परळ येथे एका पशुवैद्यक महाविद्यालयात प्रयोगशाळा साहाय्यक म्हणून काम करत त्यांनी शिक्षण घेतले. सुरुवातीला त्यांनी ‘अस्मितादर्श’ या नियतकालिकात लेखन केले.

‘बलुतं’ या आत्मकथनाद्वारे ते प्रसिद्धीस आले असले, तरी त्यांचा मूळ पिंड कवीचाच! आपल्या कवितेतून त्यांनी अस्पृश्य गणल्या गेलेल्या लोकांच्या व्यथा-वेदना बोलक्या केल्या.

शिळेखाली हात होता, तरी नाही फोडला हंबरडा

किती जन्माची कैद, कुणी निर्मिला हा कोंडवाडा  -  (कोंडवाडा)

अशा संयमित पण प्रभावी शब्दांत त्यांनी दलितांवर वर्षानुवर्षे होणारा अन्याय, त्यांचे शोषण याला वाचा फोडली. १९७४ साली प्रसिद्ध झालेल्या ‘कोंडवाडा’ या त्यांच्या पहिल्याच काव्यसंग्रहाला शासनाचा पुरस्कार मिळाला.

‘बलुतं’ (१९७८) या आत्मकथनपर पुस्तकामुळे ते साहित्यविश्वात विशेष गाजले. त्यांच्या या पुस्तकाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले. विविध भाषांमधून या पुस्तकाचे अनुवाद झाले. फोर्ड फाउंडेशनचा पुरस्कारही ‘बलुतं’साठी त्यांना मिळाला. त्यांच्या ‘बलुतं’मधून एका आगळ्या वेगळ्या, वाचकांना धक्का देणार्‍या अनुभवविश्र्वाचे दर्शन घडते. सरळ, स्पष्ट व रोखठोक निवेदन आणि आपल्या सभोवतालच्या स्थितीचे केलेले पारदर्शी,वास्तव चित्रण ही बलुतंची बलस्थाने आहेत. दया पवार यांच्या या आत्मकथनामुळे दलित साहित्यात आत्मचरित्रपर पुस्तकांचे एक नवे, वेगळे दालन निर्माण झाले, खुले झाले. दलित समाजाच्या वेदना स्वानुभवातून जाणून, उमजून घेताना आलेले अनुभव चिंतनरूपातून अशा आत्मकथनांमधून प्रकट झाले. त्या काळात ‘बलुतं’ वर, दया पवारांवर बरीच टीकाही झाली.

दलित समाजाचे दु:ख, मानसिक अवहेलना, मानवी मूल्यांचे अध:पतन स्वत:च्या लेखनातून मांडत असताना दया पवारांची भाषा केवळ विद्रोहाची नव्हती, तर ती भाषा अंतर्मुख करणार्‍या एका विचारवंत विश्लेषकाची होती, हे त्यांचे सर्वांत मोठे वेगळेपण होय.

त्यांचे ‘चावडी’ व ‘दलित जाणिवा’ हे लेखसंग्रह आणि ‘विटाळ’ हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. ‘डॉ. आंबेडकर’ या जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटाच्या पटकथेचे त्यांनी लेखन केले. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळावरही त्यांनी नियुक्ती झाली होती. भारत सरकारने ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांना गौरवले.

राष्ट्रीय पातळीवरील सामाजिक, सांस्कृतिक, वाङमयीन चळवळींमध्ये त्यांचा सातत्याने सहभाग, परभाषिक साहित्याचा व्यासंग, विश्र्लेषक वृत्ती, चिंतनशीलता, परखडपणा, सामाजिक प्रश्नांविषयी गंभीर व सखोल आस्था या वैशिष्ट्यांचा प्रत्यय त्यांच्या समग्र लेखनातून येतो. त्यांचे लेखन परिणामकारक होते. पुरस्कारांच्या माध्यमातून त्यांना काही प्रमाणात लौकिक यशही मिळाले. परंतु व्यवस्थेच्या प्रभावामुळे त्यांना वैयक्तिक आयुष्यात कायमच दु:ख, वेदना, अपयश, शारीरिक व मानसिक हालअपेष्टा यांचा सामना करावा लागला. हे कधीही न संपणारं; कमी न होणारं दु:खच त्यांच्या साहित्यातून स्वाभाविकपणे व्यक्त झालं आहे. त्यांच्याच एका कवितेतून या वेदनेची जाणीव आपल्याला होते.

दु:खानं गदगदताना हे झाड मी पाहिलेलं

तशी याची मुळं खोलवर बोधिवृक्षासारखी

बोधिवृक्षाला फुलं तरी आली,

हे झाड सार्‍या ऋतूंत कोळपून गेलेलं.

धमनी धमनीत फुटू पाहणार्‍या यातना

महारोग्याच्या बोटांसारखी झडलेली पानं

हे खोड कसलं? फांदीफांदीला जखडलेली कुबडी

मरण येत नाही म्हणून मरणकळा सोसणारं

दु:खानं गदगदताना हे झाड मी पाहिलेलं...

‘बलुतं’ बद्दल पु. ल. देशपांडे म्हणतात, ‘‘ह्या ग्रंथाच्या वाचनाने आपल्या निबर डोळ्यांना चिकटलेले आंधळ्या रूढीजन्य श्रद्धांचे सत्यदर्शनाला पारखे करणारे मोतीबिंदू गळून पडतील आणि हे भयानक वास्तव पाहता पाहता डोळ्यांत दाटणार्‍या अश्रूंत नवी किरणे उतरल्याचा साक्षात्कार होईल. माणुसकीच्या अधिक जवळ जाऊन जगायची ओढ लागेल. सार्‍या चांगल्या साहित्याचा हेतू नाही तरी दुसरा काय असतो? माणसा माणसात नवे जिव्हाळे जोडून समाजाला कृत्रिम आणि जाचक बंधनातून मुक्त करण्याचाच ना?’’ दया पवार यांच्या सर्व साहित्याबद्दल हेच म्हणता येईल.  

एका वेगळ्याच अनुभवविश्वाचा वाचकांना परिणामकारकरीत्या परिचय करून देणार्‍या या संवेदनशील साहित्यिकाचे सप्टेंबर, १९९६ रोजी अकाली निधन झाले.

महाराष्ट्राचे शिल्पकार

अभिषेक ठमके
Chapters
प्रस्तावना छत्रपती शिवाजी महाराज महात्मा - फुले लोकमान्य टिळक राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संत श्री ज्ञानेश्वर संत तुकाराम समर्थ रामदास संत नामदेव संत एकनाथ शहाजीराजे भोसले राजमाता जिजाबाई बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे श्रीमंत बाजीराव पेशवे तात्या टोपे झाशीची राणी लक्ष्मीबाई वासुदेव बळवंत फडके सावित्रीबाई फुले संत गाडगेबाबा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रबोधनकार ठाकरे कर्मवीर भाऊराव पाटील आचार्य विनोबा भावे साने गुरुजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बाबा आमटे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे एस. एम. जोशी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील बाळासाहेब ठाकरे शरद पवार डॉ. इरावती कर्वे डॉ. य. दि. फडके शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे डॉ. वसंत गोवारीकर जयंत विष्णू नारळीकर डॉ. रघुनाथ माशेलकर डॉ. विजय भाटकर श्री.वालचंद हिराचंद दोशी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील प्रा.धनंजयराव गाडगीळ शंतनुराव किर्लोस्कर जहांगीर रतन दादाभॉय (जे. आर. डी.) टाटा राहूल बजाज बी. जी. शिर्के केशवसुत-कृष्णाजी केशव दामले दादासाहेब फाळके पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर बहिणाबाई नथूजी चौधरी राम गणेश गडकरी बालगंधर्व केशवराव भोसले वि. स. खांडेकर प्रल्हाद केशव अत्रे व्ही. शांताराम बा.सी.मर्ढेकर कुसुमाग्रम -वि.वा.शिरवाडकर शाहीर अमर शेख गोविंद विनायक (विंदा) करंदीकर सुधीर फडके गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) पु.ल.देशपांडे डॉ.सरोजिनी बाबर शाहीर अण्णा भाऊ साठे पंडित भीमसेन जोशी लता मंगेशकर किशोरी आमोणकर आशा भोसले शांता शेळके नारायण गंगाराम सुर्वे विजय तेंडुलकर शाहीर साबळे बाबुराव रामचंद्र बागूल सुरेश भट विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर दया पवार सचिन तेंडुलकर खाशाबा जाधव सुनील गावस्कर अभिजित कुंटे निळू फुले संदर्भ सूची - व्यक्तिमत्त्वे